Baby infected with coronavirus recovered after 35 days treatment(PC - Twitter)

मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाने 35 दिवस संघर्ष करत कोरोनावर मात केल्याचा चमत्कार पुण्यातील भारती रुग्णालयात घडला आहे. या बाळाचं वजन केवळ 1.8 किलो होतं. त्याच्यावर भारती रुग्णालयात उपचार सुरू होते. विशेष म्हणजे हे बाळ तब्बल 22 दिवस व्हेंटिलेटरवर होतं. परंतु, या बाळाने कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

या ट्विटमध्ये मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत की, मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाने 35 दिवस संघर्ष करत कोरोनावर मात केल्याचा चमत्कार पुण्यातील भारती रुग्णालयात घडला. गर्भवती महिला या उच्च जोखीम गटात येत असल्याने या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यातच आई कोव्हिड-19 पॉझिटीव्ह असल्याने त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत होते. हा आजार आईकडून बाळास जाईल की नाही याबाबत असलेले कमी माहिती यामुळे ही भीती वाढली. (हेही वाचा - Pune Railway Station Platform Ticket: पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकीटात मोठी दरवाढ; 10 रुपयांऐवजी 50 रुपये मोजावे लागणार)

कोरोना व्हायरस-2 हा आईकडून बाळास होण्याचे प्रमाण जगभर वाढत आहे. मात्र, असे अतिशय कमी रुग्ण आहेत. सुदैवाने जगभर बहुतांश वेळा कोव्हिड-19 पॉझिटीव्ह आईचे बाळ हे कोणत्याही लक्षणाशिवाय जन्मलेले आहे. परंतु, कधी कधी प्रत्येक गोष्टीत अपवाद असतात. अशीच घटना पुण्यात एका खासगी रुग्णालयात घडली. एका आईने मुदतीच्या आधी बाळाला जन्म दिला. त्याचे जन्माच्या वेळी वजन फक्त 1.8 किलो होते आणि जन्मत:च त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता. ऑक्सिजन देण्याची गरज होती आणि हे बाळ तपासणीअंती कोव्हिड-19 पॉझिटीव्ह आले, असंही मोहोळ यांनी सांगितलं.

या बाळावर उपचार करणाऱ्या भारती हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, पुणे शहरात मंगळवारी नव्याने 1224 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 76,157 झाली आहे. तर 1168 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 14468 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.