अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरातील (Ram Mandir) रामाच्या मुर्तीला मिशी असावी, अशी मागणी शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केली होती. मिशी हे पुरुषत्वाचं प्रतीक असल्याने रामाच्या मुर्तीला मिशी असावी असं भिडे म्हणाले होते. मात्र अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास (Chief Priest Mahant Satyendra Das) यांनी भिडेंचं हे विधान चुकींचं असल्याचे म्हटलं आहे.
आज अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी भिडे यांनी रामाला मिशी असावी असे वक्तव्य केलं होतं. प्रभू राम, लक्ष्मण, हनुमान ही पुरुष दैवतं आहेत. पण त्यांची चित्रं काढताना किंवा मुर्ती साकारताना चूक झाल्याचे माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे राम मंदिरात मिशी असलेली मुर्ती बसवून आपण ती चूक सुधारुया. अन्यथा मंदिर होऊनही न झाल्यासारखं आहे, असं संभाजी भिडे म्हणाले होते. (अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीला मिशी असावी; संभाजी भिडे यांची गोविंदगिरी महाराज यांच्याकडे मागणी)
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचा राम मंदिराचे पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी चांगलाच समाचार घेतला. संभाजी भिडे यांनी भलतीसलती विधाने करु नयेत. "रामाला कधी कुठे मिशा दाखवल्या गेल्या असतील तर त्या संभाजी भिडे यांसारख्या अज्ञानी लोकांमुळेच," अशा शब्दांत दास यांनी भिडेंवर टीकास्त्र सोडले आहे. तसंच ते पुढे म्हणाले की, "प्रभु राम, श्रीकृष्ण आणि शीव ही हिंदू धर्मातील अतिशय प्रसिद्ध दैवतं आहेत. या तिन्ही देवांना पौडशवर्षीय रुप कायम दाखवण्यात आल्याने त्यांना दाढी, मिशी दाखवलेली नाही. षोडशवर्षीय म्हणेज 16 वर्षीय. देव जोपर्यंत पृथ्वीतलावर असणार तोपर्यंत ते कायम 16 वर्षीयच राहणार." असं सांगून त्यांनी देवाला दाढी-मिशा नसण्याचे कारणही स्पष्ट केले आहे.