अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीला मिशी असावी; संभाजी भिडे यांची गोविंदगिरी महाराज यांच्याकडे मागणी
Sambhaji Bhide | (Photo Credit: Facebook)

अयोध्येत (Ayodhya) उभारल्या जाणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीला मिशी असावी, अशी मागणी शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी मंदिर उभारणीतील प्रमुख गोविंदगिरी महाराज (Govindgiri Maharaj) यांच्याकडे केली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त देशभर आनंदोत्सव म्हणून साजरा व्हावा. प्रत्येक घरात रामाच्या प्रतिमेचे पूजन व्हावे, असंही संभीजी भिडे यांनी म्हटलं आहे. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी भिडे बोलत होते.

अयोध्येत येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे म्हणाले की, देशाची संस्कृती ही अतिप्राचीन आहे. महर्षी दयानंदाच्या मताप्रमाणे वेदाची निर्मिती फार वर्षांपूर्वीची आहे. प्रदीर्घ काळात देशात अनेक सुख-दु:खाचे प्रसंग आले. जगभरातील बाकी राष्ट्रे ही त्यांच्या देशासाठी कार्यरत आहेत. परंतु, भारत हा एकमेव देश विश्‍वाच्या कल्याणाचा विचार करतो. याच देशातील प्रभू रामचंद्र या अलौकीक, असामान्य आणि अतुलनीय मंदिराचा विध्वंस मुस्लिम आक्रमक बाबराने केला. त्यानंतर शेकडो वर्षांनंतर अयोध्येत राम मंदिर उभारले जात आहे. त्यामुळे हा प्रसंग सर्वांनी उत्साहाने साजरा करावा. (हेही वाचा - मुंंबईने माणुसकी गमावली! सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन अमृता फडणवीस यांंचे ट्विट पहा)

या सोहळ्यात आयोध्येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आगत्याने पूजन करावे. शिवाजी महाराजांमुळे देशावरील परकीय आक्रमणे थांबवता आली. त्यामुळे हिंदुत्व जागृत राहिले, असंही संभाजी भिडे यावेळी म्हणाले. अयोध्येतील मंदिर उभारणीतील प्रमुख गोविंदगिरी महाराज यांच्याशी मंदिर उभारणीबाबत चर्चा केली असल्याचंही भिडे यांनी सांगितलं. राम हे अतुलनीय व अनुकरणीय प्रेरणा देणारे पुरूष दैवत आहे. त्यामुळे रामाच्या मूर्तीला मिशी असावी. आजपर्यंतचे राममंदिर किंवा प्रतिमेत मिशी दिसत नाही. आजपर्यंतच्या चित्रकार व मूर्तीकार, शिल्पकारांनी मूर्ती किंवा प्रतिमा निर्माण करताना चूक केली आहे असे वाटते. त्यामुळे ती चूक दुरूस्त करावी, अशी मागणीही संभाजी भिडे यांनी गोविंदगिरी महाराज यांच्याकडे केली आहे.