Aurangabad Water Supply Scheme: राज्यातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनेचे सीएम उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
Aurangabad Water Supply Scheme (Photo Credit : Twitter)

औरंगाबाद (Aurangabad), चिखलठाणा येथील गरवारे क्रीडा संकुल येथे मनपाच्या औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे (Aurangabad Water Supply Scheme) प्रत्यक्ष भूमिपूजन आणि आभासी पद्धतीने हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन आणि स्मारक भूमिपूजन, जंगल सफारी पार्क भूमिपूजन, शहरातील विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाला, यावेळी, पाणी, रस्ते, रोजगार वृद्धी यासोबत पायाभूत सोयी सुविधांची पूर्तता आणि विकास योजना गतिमानतेने राबवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराची रखडलेली पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे समाधान असल्याचे मत व्यक्त केले.

ही योजना आगामी सन 2052 वर्षांपर्यंतच्या शहरातील लोकसंख्येचा विचार करता त्यांना लागणाऱ्या पाणी वापराचा अंदाज घेऊन नव्याने आखण्यात आली आहे. गतिमानतेने ती पूर्णत्वास नेण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कार्यक्रमास उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदि मंडळी उपस्थित होती.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबाद शहरावर विशेष प्रेम होते. तसेच औरंगाबादकरांचेही स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम होते. त्यामुळे या शहराच्या विकासाला अधिक प्राधान्य आहे. येथील गुंठेवारीचा प्रश्न, सिडकोतील घरे, मालकी हक्कांचा प्रश्न याबाबत संबंधिताना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. औरंगाबाद शहरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव देखील केंद्र शासनाला पाठविण्यात आलेला आहे.'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आज भूमिपूजन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून शहरवासीयांना मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होईल. राज्यातील सर्वात मोठी ही पाणीपुरवठा योजना आहे. तसेच पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे महिलावर्गाला याचा मोठ्याप्रमाणात लाभ होणार आहे. दरम्यान, पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांची माहिती दिली. त्याचबरोबर मराठवाड्यात मोठ्याप्रमाणात उद्योग यावेत, बेरोजगारांना रोजगार मिळावा, पाणी टंचाईचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीही शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे श्री. देसाई म्हणाले.