doctor Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना संकट काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बाजावत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या (Aurangabad) घाटी रुग्णालयातील (Ghati Hospital) डॉक्टरांना पगारासाठी तडजोड करावी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पगार थकल्यामुळे निवासी डॉक्टरांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. प्रशासनाला जाग यावी, यासाठी त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तसेच गेल्या तीन महिन्यापासून रखलेला पगार तातडीने द्यावे, अशी मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे. डाक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 490 निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांपासून पगार थकले आहेत. निवासी डॉक्टरांचे वैद्यकीय अधिक्षक कार्यालयासमोर निदर्शने सुरु आहेत. तसेच रुग्णालय प्रशासनाविरोधात डॉक्टरांची घोषणाबाजी सुरु केली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह विदर्भातून रुग्ण येतात. या रुग्णांवर निवासी डॉक्टरांकडून उपचार केला जातो. आंदोलन करणाऱ्यांपैकी बरेचसे डॉक्टर कोरोना रुग्णांवरदेखील उपचार करत आहेत. तर काही डॉक्टर इतर आजारांवर उपचार करत आहेत, अशी माहिती टीव्ही9ने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Ganeshotsav 2020: कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना अन् आपल्या सर्वांना शक्ती मिळो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा!

औरंगाबाद हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यातच घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी पुकारलेले आंदोलन अनेक रुग्णांसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.