'एकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार' औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांचा खुलासा
Nandakumar Ghodele (Photo Credit: Twitter)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्मारक उभारण्यासाठी 1 हजार झाडे तोडण्यात येणार आहे, अशी चर्चांनी जोर धरला आहे. एवढेच नव्हे तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही याविषयावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यातच औरंगाबादचे (Aurangabad) महापौर नंदकुमार घोडेले (Nandkumar Ghodele) यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी एकही झाड तोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची उभारणी कशाप्रकारे केली जाणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवत ‘आरे’तील मुंबई मेट्रोशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. या निर्णयाबद्दल कौतूक होत असतानाच औरंगाबाद शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडे तोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. एवढेच नव्हे तर अमृता फडणवीस यांनीही याबाबत शिवसेनेवर जोरदार टिका केली आहे. यावर औरंगाबादचे महापौर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आरे संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. आम्ही सुद्धा झाडाच्या एकाही पानालाही हात न लावता बाळासाहेबांचे स्मारक उभे करू. यासंदर्भात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. महापालिका प्रशासनाने मागे न्यायालयातही शपथपत्र दिले होते की, आवश्यक असतील ती झाडे तोडू. पण, आता महापालिका प्रशासनाची भूमिका बदण्यास सांगण्यात येईल आणि एकही झाडे न तोडता स्मारक उभारू. तसे आदेश लवकरच प्रशासनास देण्यात येणार आहेत” असे औरंगाबादचे महापौर म्हणाले आहेत, अशी माहिती लोकसत्ता वृतपत्राने दिली आहे. हे देखील वाचा-'शिवसेना ही ढोंगी आहे' अमृता फडणवीस यांच्या ट्वीटचा नेमका अर्थ काय? घ्या जाणून

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाची सुत्रे हाती घेताच निसर्गाला नुकसान करणाऱ्या आरे कारशेडला स्थगिती दिली होती. शिवसेनेचा विकासाला विरोध नसून पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या मेट्रो कारशेडला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यानंतर औरंगाबाद येथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बाधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.