(Archived, edited, symbolic images)

औरंगाबाद (Aurangabad) शहरातील औद्योगिक परिसरात (Aurangabad Industrial Belt) गुंडांची दहशत वाढत असल्याचे चित्र आहे. अचानक कोणत्याही कंपनी, कार्यालयात घुसणे तिथल्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांशी उद्धटपणे बोलणे, शिविगाळ करणे, प्रसंगी मारहाण करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. हे गुंड दुचाकी वाहनांच्या शोरुममध्ये घुसतात आणि हव्या तेवढ्या गाड्या घेऊन पेट्रोल पंपावर जातात आणि पेट्रोल भरुन फिरवतात. आता तर गुंडांचा उच्छाद इतका वाढला आहे की, एका गुंडांच्या टोळक्याने भोगले अ‍ॅटोमोबाईल्स या कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. धक्कादायक म्हणजे गुंडांनी सीसीटीव्ही कुठे आहे असे विचाले आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही समोर नेऊन मारहाण केली. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उद्योग क्षेत्रातून उमटत आहेत. दरम्यान, उद्योगमंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

प्राप्त माहितीनुसार, भोगले अ‍ॅटोमोबाईल्स या कंपनीतील प्रशासनाने एका कर्मचाऱ्यास पूर्ण क्षमतेने काम करण्याची लेखी हमी मागितली. ही हमी मागितल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने हात धुण्याच्या साबणाचे पाणी प्यायले. वैद्यकीय उपचारांसाठी या कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दहा-बारा जणांचे एक टोळके कंपनी कार्यालयात आले. त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सीटीटीव्ही समोर नेऊन मारहाण केली.

दरम्यान, गुंडांकडून कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे औरंगाबादमधील औद्योगीत परिसरात तीव्र पडसाद उमटले आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे औरंगाबादमधील चांगल्या आणि निकोप असलेल्या औद्योगिक वातावरणास गालबोट लागत आहे, अशी भावना उद्योजक संघटना आणि औद्योगिक वर्तुळातून उमटत आहे. तसेच, संबंधित घटनेबाबत पालकमंत्री, उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना कळवले जाईल, असे संघटनांनी म्हटले आहे.