
औरंगाबाद (Aurangabad) येथील एका बिल्डरच्या कार्यालयातून 6 लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी ऑफिस बॉयसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे. संतोष देविदास धनुका असे बिल्डरचे नाव आहे. धनुका यांनी शुक्रवारी बांधकाम साहित्य आणि कामगारांना पगार देण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये 6 लाख रुपये आणून ठेवले होते. याची माहिती ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयला होती. परंतु, धनुका हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. मात्र, परत आल्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये ठेवलेली रक्कम गायब झाल्याची त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब स्थानिक पोलीस ठाण्यात याची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम हस्तगत केली आहे.
संतोष राणा, अकाश निकम, मयुर कऱ्हाडे अशी आरोपींची नावे आहेत. धनुका यांच्या जालना रोडवरील सिंचनभवन समोर असलेल्या कार्यालयात कामाला हे तिघेही कामाला आहेत. शुक्रवारी धनुका यांनी बांधकाम साहित्य आणि कामगारांच्या रोजंदारीची रक्कम देण्यासाठी सहा लाख रुपये आणूण ठेवले होते. त्यांनी रकमेची बॅग दालनात ठेवली होती. परंतु, काम आटपून परत आल्यानंतर धनुका यांना दालनात ठेवलेली रक्कम गायब झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तातडीने जिन्सी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. धनुका यांनी दालनात रक्कम ठेवल्याची माहिती संतोषला होती. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरु करुन संतोषसह अकाश आणि मयुर या तिंघांना अटक केली. तसेच त्यांच्याजवळील रोख रक्कम हस्तगत केली आहे.
हे देखील वाचा- Online Education: आईने मुलीला पेन्सिलनं भोसकलं; ऑनलाईन वर्गावेळी मुंबईतील घटना. मिळालेल्या माहितीनुसार, जिन्सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक याप्रकरणाची चौकशी करत होते. काही तासातच आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.