Pune मध्ये संशयित दहशतवादी अटकेत, ATS कडून कारवाई
प्रातिनिधिक प्रतिमा (फाइल फोटो)

Pune: खलिस्तानी दशतवादाचे पुणे कनेक्शन स्पष्ट झाले असून दहशतवादी संघटनेशी संबंध असणाऱ्या एका संशयित आरोपीला चाकण येथून अटक करण्यात आली आहे. तसेच पुणे एटीएस (ATS) या पथकाने सापळा रचून या संशयिताला पकडले आहे.

हरपालसिंग प्रतापसिंग नाईक अस या संशयिताचे नाव आहे. हरपालसिंह हा मूळचा पंजाब येथील रोपर जिल्ह्यात राहणारा आहे. मात्र सध्या तो कर्नाटकातील बेल्लारी येथे राहत होता. हरपालसिंग कडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 3 डिसेंबर रोजी न्यायलयाने हरपालसिंगला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसेच त्याच्या अटकेची गुप्तता पाळण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आज मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पुणे एटीएसने त्याच्याबद्दलच्या धक्कादायक घटनांचा खुलासा न्यायालयासमोर केला.

या प्रकरणी तपास करताना हरपालसिंग त्याच्या साथीदारांच्या मदतीने देशाच्या एकात्मता विस्कळीत करण्याच्या मार्गावर होता. तसेच या कामासाठी तो इंटरनेट आणि सोशल मिडियाचा वापर अत्यंत प्रभावीपणे करत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे न्यायालयाने आज त्याचा न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. तर हरपालसिंगचा मित्र मोईन याला पंजाब सरहद पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या पुढील तपासासाठी मोईनची सुद्धा एटीएस कडून लवकरच कसून चौकशी करण्यात येणार आहे.