महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ही सोशल मीडियावर मोहीम म्हणजे राजकीय षडयंत्र: अशोक चव्हाण
Ashok Chavan (Photo Credits-ANI)

सोशल मीडियावर चालवण्यात येत असलेल्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President's Rule) या मोहिमेचे सूत्रधार कोण आहेत हे तपासायला हवे. तसेच, हे एक राजकीय षडयंत्र असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, मुंबई येथील वांद्रे रेल्वे स्टेशन परीसरात जमलेल्या गर्दीचा (Bandra Incident) तपास सखोल पद्धतीने करण्यात येत असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि संबंध देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. गर्दी टाळून कोरोना व्हायरस संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशातील स्वायत्त संस्थांनीही आपले नियोजित उपक्रम स्थगित केले आहेत. यात मुख्य निवडणूक आयोग, न्यायालय आणि राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचाही समावेश आहे.

दरम्यान, राज्यातील सर्व निवडणुका पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. तसेच, सर्व निवडणूक उपक्रम स्थगित करण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यपदाचे काय होणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस संकट, लॉकडाऊन काळात उद्योग विश्वाने कामगारांची काळजी घ्यावी- शरद पवार)

पीटीआय ट्विट

घटनेतील तरतुदीनुसार राज्याचे मंत्रीपद स्वीकारलेल्या कोणत्याही व्यक्तीस पदग्रहण केल्यापासून पुढील 6 महिन्यात विधमंडळ सदस्य होणे बंधनकारक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या विधिमंडळाच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यातच आगामी विधान परिषद निवडणुकाही लॉकडाऊनमुळे लांबणीवर टाकल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे जर नियोजित वेळेत विधिमंडळ सदस्य झाले नाहीत तर सरकार धोक्यात येऊ शकते.

पीटीआय ट्विट

दरम्यान, राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर जाण्यााचा उद्धव ठाकरे यांचा मार्ग मोकळा आहे. मंत्रीमंडळानेही उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे जर राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर गेले तर सरकारला कोणताही धोका नाही. तसेच, उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे सध्या स्थितीत तरी राज्य सरकार मजबूत आहे. मात्र, असे घडले नाही तर मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट येणार की काय ? अशी चर्चा केली जात आहे. सोशल मीडियावरही तशाच प्रकारचे बोलले जात असून, त्यावर अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे.