Ashish Shelar (Photo Credits-ANI)

आगामी बीएमसी निवडणुकीची रणनीती आखणारे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शुक्रवारी (27 जानेवारी) ही जीवे मारण्याची धमकी देत ​​त्याचे तुकडे करू, असे सांगण्यात आले आहे. वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयात आज सकाळी धमकीचे पत्र आले आहे. शेलार यांच्या वांद्रे कार्यालयातील लेटर बॉक्समध्ये हे धमकीचे पत्र कोणीतरी टाकून तेथून निघून गेले. याप्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीच्या पत्रात भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात असभ्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस प्रथम धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 'आम्ही तुझे तुकडे करू,' असे या धमकीच्या पत्रात लिहिले आहे. तसेच तुम्ही असेच आक्रमक राहिल्यास आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना जीवे मारून समुद्रात फेकून देऊ, असेही लिहिले आहे.या पत्रात शेलार यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे.

बीएमसी निवडणुकीचे वातावरण तयार होण्यापूर्वीच शेलार यांना ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्या व्यक्तीचा हेतू राजकीय तर नाही ना, हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आणि आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कार्यालयात जीवे मारण्याची धमकी आली आहे. (हेही वाचा: 'लोकशाहीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे'- उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावर CM Eknath Shinde यांची प्रतिक्रिया)

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाखाली राज्याचे गृह खाते आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून लवकरच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला न्यायालयात हजर केले जाईल. भाजप अशा धमक्यांना याआधी कधीही घाबरत नव्हता आणि भविष्यातही त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.