'आशिष शेलार मुंबईकरांची दिशाभूल करण्याचे, आगी लावायचे काम करत आहेत'; महापौर किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर
Kishori Pednekar | (Photo Credit: Twitter/ANI)

शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि भाजपचे आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी घरांसाठी कर माफ करण्याच्या घोषणेवरून शेलार आणि पेडणेकर आमने सामने आले आहेत. शिवसेनेने ज्या तारखेपासून हे आश्वासन दिले होते त्या तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना, ‘या मुद्द्यावरून मुंबईकरांची कोंडी करून, मुंबईकरांना भरकटवण्याची सुपारी आशिष शेलार यांनी उचलली आहे’, असा पलटवार किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी ट्वीट टीका केली होती की, ‘सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सुट दिली. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिली. विदेशी दारुला करात 50% सुट दिली. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबईकरांची आठवण झाली.’

त्यांनी पुढे मागण्या केल्या की, ‘आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखेपासून 500 चौ.फु. घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा. अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरे 500 चौ.फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500 चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा. 500 चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांनाही हीच सुट देणार का?’ (हेही वाचा: महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा अडचणीत, राज्यपालांकडून बीएमसीच्या आश्रय योजनेची चौकशी करण्याचे आदेश)

पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देत, ‘ही आशिष शेलार यांची पोटदुखी आहे. आधी त्यांना वाटत होते की हे होणारच नाही. मात्र आता हे शक्य झाले आहे तर, कुठे ना कुठे भांडणे लावायची, तसेच मुंबईकरांना भरकटवण्याचे काम करण्याची सुपारी आशिष शेलार यांनी घेतली आहे. मुंबईकरांना चांगल्या गोष्टी देण्यासाठी आम्ही बांधील आहोत व अशा एक-एक गोष्टीमधून आम्ही वचनाची पूर्तता करत आहोत. त्यामुळे आता आशिष शेलार मुद्दल आगी लावत आहेत.’ अशा प्रकारे शेलार यांच्या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.