Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019: समस्त वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले विठुमाऊली यांचा अदभूत वारी आणि पालखी विशेष सोहळ्याला आता काही तासांत सुरुवात होणार आहे. याचे वारीसाठी असंख्य असा वारकरी संप्रदाय उपस्थित राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी 2019 (Ashadhi Wari 2019) निमित्ताने पुण्याच्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वारी काळामध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी आणि पालखी मार्गावर दारूदुकाने, मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री 24 जून आणि 25 जून रोजी बंद ठेवण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
पालखी मार्गावरील मांसाहार, मद्यविक्री, मांसविक्रीला वारी दरम्यान बंदी घालण्यात यावी अशी मागणी गेल्या 35 वर्षांपासून वारक-यांनी उचलून धरली होती. त्यावर योग्य असा निर्णय शासनाकडून घेण्यात आला नव्हता. मात्र अखेर यंदाच्या वारी कालावधीमध्ये पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी आणि मार्गावर दारू, मांस आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तर 25 जूनला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या दरम्यान आज आणि उद्या पालखीच्या मुक्कामांच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर मांसाहारी हॉटेल, मासे बाजार, कत्तलखाने आणि दारूची दुकाने बंद ठेवावी, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर या सोहळ्यामध्ये सामील असणाऱ्या वाहनांची तपासणी करणे आणि त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देणे, वाहतुकीचे नियोजन, सुरळीत विद्युत व्यवस्था या गोष्टींवरही विशेष लक्ष देण्यातच आले आहे.