Baramati: बारामती जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बारामतीत (Baramati) एका डॉक्टरला घराचा दरवाजा उघडला नाही म्हणून मारहाण करण्यात आली आहे. युवराज गायकवाड असं या डॉक्टरांचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज गायकवाड यांचा सांगवी येथे साई क्लिनिक या नावाने हॉस्पिटल आहे. डॉक्टर साई क्लिनिकमध्येचं राहतात. डॉक्टर आपल्या घरामध्ये जेवण करत होते. यावेळी चार जणांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, जेवण करत असल्याने डॉक्टर गायकवाड यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे संतापलेल्या चौघांनी खिडकीची काच फोडली.
काच फोडल्याचा आवाज आल्याने डॉक्टर गायकवाड घराचा दरवाजा उघडून बाहेर आले. यावेळी बाहेरील चार जणांनी डॉक्टरांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने डॉक्टर गोंधळले. बाहेरचा गोंधळ ऐकून डॉक्टर गायकवाड यांचा मुलगा विराज घराबाहेर आला. या चौघांनी विराजलाही मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी डॉक्टर गायकवाड यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरुन पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या घटनेचा पुढीत तपास पोलीस करत आहेत. (हेही वाचा - Mumbai Shocker: मुंबई मध्ये 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली शाळेचा सुरक्षा रक्षक अटकेत; POCSO Act अंतर्गत कारवाई)
यापूर्वी राज्यातील विविध ठिकाणी डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच मनमाडमध्येही डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. चुकीचे उपाचार आणि रिपोर्ट न दिल्याचा आरोप करत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली होती.
प्राप्त माहितीनुसाक, जितेंद्र गांधी असं या मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टरांच नाव होतं. मनमाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जितेंद्र गांधी यांचे गांधी हॉस्पिटल आहे. डॉक्टर जितेंद्र गांधी हे संध्याकाळच्या सुमारास दवाखान्यात नेहमीप्रमाणे रुग्णांना तपासत होते. यावेळी पाच ते सहा तरुण त्यांच्या रुग्णालयामध्ये आले आणि त्यांनी आपले नातेवाईक अनुष्का गरुड या मुलीचे रिपोर्ट आम्हाला द्या, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी लगेचचं डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले होते.