आर्यन खान ड्रग्ज प्रकरण (Aryan Khan Drugs Case) आणि त्याच्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (Narcotics Control Bureau)ने केलेली कारवाई सध्या देशभर गाजते आहे. आर्यन खान हा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रसारमाध्यमांसह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. गौप्यस्फोट होत आहेत. आज दिवसभरात या प्रकरणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. यात प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी एनसबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि केपी गोसावी (KP Gosavi) यांच्यावर केलेले गंभीर आरोप. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलीक (Nawab Malik) आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रीया महत्वाचे आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रभाकर सेल यांचे गंभीर आरोप
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईतील एकूण साक्षीदारांपैकी गायब असलेल्या केपी गोसावी याच्या सहकाऱ्याने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. प्रभाकर सेल असे या सहकाऱ्याचे नाव आहे. प्रभाकर सेल हे केपी गोसावी याचा खासगी सुरक्षारक्षक असल्याचे सांगतात. सेल यांनी एनसबी अधिकारी समीर वानखेडे आणि केपी गोसावी यांनी आपल्याला क्रुज ड्रग्ज छापा प्रकरणात साक्षीदार केले. मात्र, त्यांनी आपल्या कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्याचे म्हटले आहे. या आरोपांवर एनसीबी काय प्रतिक्रिया देते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणात गौप्यस्फोट, KP Gosavi याचे सहाय्यक प्रभाकर सेल यांचा एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप)
अर्धा ग्रॅम, पाव ग्रॅम ड्रग्ज पकडून महाराष्ट्रावर गंभीर आरोप- संजय राऊत
प्रभाकर सेल यांचा व्हिडिओ आणि प्रसारमाध्यमांतून प्रतिक्रिया आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. आर्यन खान प्रकरणात 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी याची गंभीर आणि सखोल चौकशी करावी. महाराष्ट्राला मागच्या काही दिवसांपासून बदनाम करण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही हे सांगितले आहे. महाराष्ट्रातील पोलीसांनी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज पकडले आहे. परंतू, आर्धा ग्रॅम, पाव ग्रॅम ड्रग्ज पकडून महाराष्ट्राला बदनाम करतात. मुंबई पोलिसांच्या कामगिरीला डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच या प्रकणाची सखोल चौकशी व्हावी असेही म्हटले आहे.
एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी- नवाब मलिक
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. खळबळजनक आरोप केले आहेत. आरोपांची दखल घेऊन राज्य सरकारने या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. या संदर्भात आपण राज्याच्या . गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटणार असल्याचेही मलीक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रामाणीक असलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना व्हिलन ठरविण्यासाठी आरोप केले जात आहे. त्यासाठी राज्य सरकार माफियांच्या मागेही उभे राहिलेले दिसते आहे. खऱ्या गुन्हेगाराला सोडून वानखेडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला दोषी ठरविण्यासाठीच कट रचला जातो आहे. त्यातूनच अशा प्रकारच्या क्लिप बाहेर आल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.