Arnab Goswami allegations on Maharashtra Police: अटक करताना खरोखरच मारहाण? अर्नब गोस्वामी यांच्या आरोपांवर पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
Arnab Goswami | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रिपब्लिक चॅनल (Republic TV) संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. त्यानंतर गोस्वामी यांना न्यायालयात दाखल करण्यात आले. या वेळी गोस्वामी यांनी पोलिसांकडून (Maharashtra Police) आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. गोस्वामी यांच्या आरोपावर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिले आहे. गोस्वामी आणि पोलीस या दोघांनीही आपली बाजू न्यायालयात मांडली आहे. काय आहेत या बाजू घ्या जाणून.

अर्नब गोस्वामी यांचा आरोप काय?

अर्नब गोस्वामी यांनी महाराष्ट्र पोलिसांवर आरोप करत म्हटले आहे की, अटक करतेवेळी पोलिसांन त्यांना मारहाण केली. कारवाई करताना पोलिसांनी कुटंबातील सदस्य आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली. अर्नब यांच्या डाव्या हाताला आगोदरच दुखापत झाली होती. त्यावर पट्टी बांधली होती. ही पट्टीही पोलीसांनी काढून टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांच्या हातावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा आरोप अर्नब गोस्वामी यांनी केला आहे. तसेच, आपल्या अटकेची माहिती आपल्या पत्नीला देण्यात आली नाही, असेही गोस्वामी यांनी म्हटले आहे.

पोलिसांचे स्पष्टीकरण काय?

अर्नब गोस्वामी याने केलेले आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. गोस्वामी यांच्या घरात प्रवेश केल्यापासून घडलेल्या सर्व घटनांचे पोलिसांनी चित्रीकरण केले आहे. गोस्वामी यांना अटक करताना असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Anil Parab on Arnab Goswami: भाजपचा पोपट पिंजऱ्यात बंद, अर्नब गोस्वामी प्रकरणावर अनिल परब यांची प्रतिक्रिया)

दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचे आरोप आणि स्पष्टीकरण ऐकून घेतले आहे. त्यानंतर न्यायालायने आदेश दिले आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अहवाल मागविला.

काय आहे प्रकरण?

रिपल्बिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 या दिवशी आत्महत्या केली होती. अलिबाग येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता. याच प्रकरणात पोलिसांनी गोस्वामी यांना ताब्यात घेतले आहे.