Manoj Jarange | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

APMC Market Bandh: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषण आणि आंदोलनास विविध स्थारातून पाठींबा मिळत आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) नेही या आंदोलनास पाठींबा दिला आहे. त्यासाठी आज एपीएमसी (APMC) मार्केट संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. मार्केटमधील सर्व माथाडी कामगारांनी एकत्र येत मराठा आरक्षणास आपला पाठींबा दर्शवला आहे. त्यासाठी हे कामगार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही करणार आहेत. त्यामुळे आज फळ मार्केट, फूल मार्केट, मसाला मार्केट यांसह इरही सर्व मार्केट बंदराहणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या निर्णयानुसार, नरेंद्र पाटील (Narendra Patil) आणि आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या उपस्थितीत माथाडी कामगारांनी एपीएमसी (APMC) मार्केट संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.

मनोज जरांगे यांनी प्रथम जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात उपोषण सुरु केले. हे उपोषण काही काळ सुरु राहिल्यानंतर शांततेत सुरु असलेल्या या आंदोलक आणि उपोषणकर्त्यांवर जालना पोलिसांनी अचानक लाठीमार केला. ज्यामुळे हे आंदोलन आणि प्रश्न अधिकच चिघळला. मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रभर सहानुभूती आणि पाठिंबा मिळाला. दरम्यान, त्यांच्या भेटीसाठी आलेल्या शिष्ठमंडळाने आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला. यावर जरांगे यांनी सरकारला 41 दिवसांची मुदत मागितली. जी नुकतीच संपली पण सरकारद्वारे आरक्षणाची घोषणा झालीच नाही. परिणामी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.

मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे अवानह करण्यासाठी फोन केला असता त्यांनी आरक्षण द्या उपोषण मागे घेतो, असे सांगितले. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच, उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावर आरक्षण मिळाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही. मात्र, आपला मान म्हणून एक दिवस पाणी प्रशान करतो, असे सांगितले. तसेच, संभाजीराजे यांचा मान राखत जरांगे यांनी पाणी प्राशन केले. मात्र, उपोषण सुरुच ठेवले.

दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा गावोगावी पोहोचला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते विविध कार्यक्रमांसाठी गावात जाऊ शकत नाही. जर त्यांनी जायचा प्रयत्न केलाच तर गावकरी त्यांना वेशीवरच आडवत आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन पुढे काय स्वरुप घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.