Anti-CAA Protest: IIT Bombay च्या विद्यार्थ्यांनी देखील दर्शवला जामिया मिलिया विद्यापीठातील आंदोलनाला पाठिंबा
Delhi Protest Photo| (Photo Credit- IANS)

नागरिकत्व दुरूस्ती कायदा भारतामध्ये अस्तित्त्वात आल्यानंतर ईशान्य भारतातून या कायद्याला प्रखर विरोध करण्यात आला आहे. हळूहळू त्याचे पडसाद भारतातील इतर परिसरात उमटायला सुरूवात झाली आहे. काल (15 डिसेंबर) रात्री दिल्लीच्या जामिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी काही जणांची धरपकड केली मात्र आज पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. मात्र या आंदोलनाला आता आयआयटी मुंबई मधील विद्यार्थ्यांनी आपला पाठिंबा दिला आहे. दिल्लीनंतर अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन; AMU 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, इंटरनेट सेवा ठप्प.

आसाम पासून पश्चिम बंगालपर्यंत नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्यावर लोकांमध्ये असंतोष आहे. दरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू असल्याने पर्यटकांनी या भागात जाणं टाळावं असे आवाहन करण्यात आलं आहे. अशातच यामध्ये आता विद्यार्थ्यांनीही उडी घेतली आहे. दिल्लीत पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण होते. त्यानंतर कुलगुरूंनीही या प्रकारावर आपला निषेध नोंदवला आहे.

रविवारी रात्री मुंबईमधील विद्यार्थ्यांनीही हातामध्ये मशाल घेऊन रॅली काढण्यात आली होती. त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आहे. ट्वीटरवरही काही काळ #IITBombay असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. दिल्लीच्या घटनेला अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीदेखेऐल निषेध वर्तवला आहे. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनानेदेखील सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.