दिल्लीनंतर अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन; AMU 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, इंटरनेट सेवा ठप्प
अलिगड मुस्लिम विद्यापीठात हिंसाचार (संग्रहित संपादित प्रतिमा)

नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (Citizenship Amendment Act) निषेधार्थ रविवारी सलग तिसर्‍या दिवशी अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठात (Aligarh Muslim University) विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला. कॅम्पसमध्ये मिरवणूक काढून विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वार बाब-ए-सय्यदवर निदर्शने केली आणि दिल्ली व यूपी पोलिसांच्या विरोधात तसेच धार्मिक घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधातही घोषणा दिल्या. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने 5 जानेवारीपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास 60-70 विद्यार्थ्यांच्या समूहाने एएमयू कॅन्टीनमधून जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर जामिया प्रशासनाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कॅम्पसमध्ये घुसून तिथल्या विद्यार्थ्यांना व कर्मचार्‍यांना मारहाण केली.

निषेध करणार्‍या विद्यार्थ्यांनी अलीगढ़मधील पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यात डीआयजींसह अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ‘मुल्क बचाने निकले हैं, आप हमारा साथ दो, इंसानियत बचाने निकले हैं, आप हमारा साथ दो’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. यानंतर इतर विद्यार्थ्यांना आंदोलन करणाऱ्या गटाने संबोधितही केले. ‘हा कायदा धार्मिकतेच्या आधारे बनविला गेला आहे, जो खपवून घेतला जात नाही. हा कायदा घटनेच्या विरोधातही आहे. याची पर्वा न करता कायदे केले गेले आहेत. त्याचा विरोध कायम राहील.’ असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीत आंदोलकांचा हिंसाचार; बसेस आणि दुचाकी जाळल्या)

जामियाच्या विद्यार्थ्यांनी, नागरी दुरुस्ती कायद्याचा निषेध करणाऱ्या मिलिया इस्लामिया विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याला मानवता विरोधी कृत्य असे म्हटले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी तकबीर, अल्लाह-ओ-अकबर अशी घोषणाबाजीही केली. अशा गोष्टी समाज विरोधी घटक असल्याचे कारण देत विद्यापीठ 5 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अलीगढ़मध्ये 16 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेटसेवा देखील बंद ठेवण्यात येणार आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशातील बर्‍याच भागात निदर्शने होत आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निदर्शकांनी हिसक रूप घेतले आहे. आंदोलकांची पोलिसांशी चकमकही झाली आहे. आसाममधील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. अशात राजधानी दिल्लीमधील जामिया परिसरात निषेध करणार्‍या विद्यार्थ्यांनी, दिल्लीच्या मथुरा रोडवर 4 बस जाळल्या आहेत. तसेच 6 बसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर आता अलीगढ़मध्येही हिंसाचार उफाळला आहे.