DTC bus set ablaze | (Photo Credits: ANI)

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (Citizenship Amendment Act) विरोधात देशातील बर्‍याच भागात निदर्शने होत आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निदर्शकांनी हिसक रूप घेतले आहे. आंदोलकांची पोलिसांशी चकमकही झाली आहे. आसाममधील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. त्याचबरोबर आसाम आणि पश्चिम बंगालच्या बर्‍याच भागात अजूनही इंटरनेट निर्बंध कायम आहेत. अशात राजधानी दिल्लीमधील (Delhi) जामिया (Jamia) परिसरात निषेध करणार्‍या विद्यार्थ्यांनी, दिल्लीच्या मथुरा रोडवर 4 बस जाळल्या आहेत. तसेच 6 बसची तोडफोड करण्यात आली आहे. याशिवाय जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही बस जाळण्यात आली.

आंदोलकांनी जामियाहून संसदेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. रविवारी आंदोलक हिंसाचारावर उतरले आणि सराय जुलैना येथे 3 बसना आग लावण्यात आली. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या चार फायर टेंडर घटनास्थळी दाखल झाले, परंतु आंदोलकांनी अग्निशमन इंजिनचीदेखील तोडफोड केली, ज्यात एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाला. दिल्ली वाहतूक पोलिसांनी ट्वीट करून माहिती दिली. या निषेधामुळे ओखला अंडरपास ते सरिता विहार हा रस्ता बंद करण्यात आला आहे. (हेही वाचा: पश्चिम बंगाल: नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरुद्ध आंदोलन पेटले; मुर्शिदाबाद येथे 5 एक्सप्रेस ट्रेन जाळत नोंदवला निषेध (Watch Video))

दरम्यान, गुवाहाटी येथे रविवारी दोन आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधाच्या वेळी गुरुवारी पोलिस गोळीबारात हे दोघेही जखमी झाले होते. ईश्वर नायक आणि अब्दुल अलीम अशी मृतांची नावे आहेत. तेलाच्या टँकरला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. अशाप्रकारे, आसाममधील निषेधादरम्यान मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या पाच झाली आहे. हावडा-मुर्शिदाबादमध्ये आंदोलकांनी बस, स्थानके, दुकाने आणि टोल प्लाझा जाळले. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कृष्णापूर स्टेशनवर जमावाने पाच रिकाम्या गाड्यांना आग लावली, तर लालगोला स्थानकातील रेल्वे रुळांची तोडफोड करण्यात आली.