PMC Bank Customers (Photo Credit : Youtube)

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेत (PMC) झालेल्या घोटाळ्याच्या धर्तीवर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेड (Shivajirao Bhosale Co-operative Bank), पुणे यावरही बंदी घातली आहे. 6 मे रोजी आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार शिवाजीराव भोसले बँकेवरील 4 मे 2019 पासून निर्बंध लागू आहेत. या बंदीला चार महिने झाले तरी, आरबीआयने अद्याप या बँकेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही यामुळे बँकेचे ग्राहक अस्वस्थ झाले. आरबीआयने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर बँकिंग रेग्युलेशन कलम 1949चे पोट-कलम (1) चे कलम 35A अन्वये ही बंधने घातली आहेत.

पुण्यातील मुख्यालय असलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेडच्या कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाने बँकेचे संचालक मंडल बरखास्त केले. बँकेच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासकाची नेमणूकही करण्यात आली आहे. सरकारकडून झालेल्या चौकशीत या बँकेने तब्बल 300 कोटींचे अनियमित कर्ज वाटप केल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर आरबीआयने घातलेल्या निर्बंधांनुसार बँकेच्या ग्राहकांना केवळ एक हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. (हेही वाचा: PMC बँक घोटाळ्यामुळे 'या' अभिनेत्रीला घर चालवण्यासाठी विकावे लागले दागिने)

आरबीआयने पुढील आदेश येईपर्यंत बँकेतून पैसे काढणे, ठेवी, कर्ज, गुंतवणूक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यास मनाई केली आहे. आरबीआयने म्हटले होते की, बँकेची आर्थिक परिस्थिती बळकट होईपर्यंत हे निर्बंध लागू केले जातील. या बंदीला चार महिने उलटून गेले तरी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या भविष्याबाबत आरबीआय कोणताही निर्णय घेऊ शकलेला नाही. याच कारणास्तव हजारो खातेदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत. खातेदार पैसे प्राप्त करण्यासाठी दीर्घ काळापासून मागणी करीत आहेत. 1 ऑक्टोबर रोजी बँकेच्या सुमारे 250 खातेदारांनी पुण्यातील शिवाजी नगर शाखेबाहेर निदर्शने केली. त्यानंतर 25 ऑक्टोबरपासून पैसे काढण्याची परवानगी देण्यात येईल असे बँकेचे संचालक अनिल भोसले यांनी सांगितले आहे.