Anil Deshmukh On Police Bharti: राज्यात पोलिस भरतीसाठी पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. आज नागपुरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असली तरी राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अनिल देशमुख यांच्या या घोषणेमुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी अनिल देशमुख म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा उशीर लागला. परंतु, आम्ही मराठा नेत्यांशी यासंदर्भात बोललो आहोत. राज्यात पोलीस भरती होणे आवश्यक असल्याचंही आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्यांनी भरती प्रक्रिया सुरू करण्यास होकार दर्शवला आहे. (वाचा - Maharashtra Police Bharti 2021: पोलीस खात्यात 12,538 जागांसठी भरती होणार, गृहमंत्री अनिल देखमुख यांची घोषणा)
दरम्यान, महाराष्ट्रात एकूण 12538 जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तसेच उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती केली जाईल, असंही अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया एसईबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडली होती. गृह मंत्रालयाने भरती प्रक्रियेत SEBC आरक्षण न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मराठा समाजातील सर्वच संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती.