Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers’ protest) केलेल्या ट्विटप्रकरणी राज्याच्या गृहमंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशाबाबत विरोधी पक्षांनी जोरदार टीका केल्यानंतर आणि प्रसारमाध्यमांतून चर्चा होऊ लागल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी खुलासा केला आहे. हा खुलासा करताना संबंधित सेलिब्रेटींच्या ट्विटबाबत चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले (Anil Deshmukh on Celebrity Tweets Investigation) आहे. सेलिब्रेटी आणि भारतरत्नांनी केलेल्या ट्विटची जशी चर्चा सुरु आहे तशीच चर्चा या ट्विटच्या चौकशीचीही होऊ लागली आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये काय म्हटले?

भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत.पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. (हेही वाचा, शेतकरी आंदोलनावर Lata Mangeshkar, Sachin Tendulkar सह सेलिब्रिटींच्या ट्वीट्समधील साधर्म्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चौकशीचे आदेश; राज्याचं गुप्तहेर खात करणार तपास)

केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थानबर्ग आणि पॉप सिंगर रेहाणा यांच्यासह विदेशातील अनेकांनी ट्विट करुन पाठिंबा दर्शवला. त्यानंतर भारताली सेलिब्रेटींनी मोठ्या प्रमाणावर रिहाना, ग्रेटा यांच्या ट्विट विरोधात ट्विट केले. हे ट्विट करण्यामध्ये बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, सुनिल शेट्टी यांच्यासह भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडूलकर यांचाही समावेश आहे. सेलिब्रेटींनी केलीली ट्विट आणि त्यातील शब्द पाहता थोड्याफार फरकाने ही ट्विट अगदी समान आहेत. त्यामुळे ही ट्विट्स त्यांची स्वताची आहेत की त्यांना कोणी दिली होती याबाबत शंका निर्माण झाली. सोशल मीडियावर चर्चा, आरोप प्रत्यारोपांचा पाऊस पडला.

दरम्यान, सर्व सेलिब्रेटींनी एकाच विषयावर केलेली ट्विट सारखीच कशी? तसेच, त्यांची वेळही थोड्याफार फरकाने एकच कशी? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर या ट्विट्सची चौकशी करावी अशी मागमी केली. राज्य सरकारच्या गृहमंत्रालयानेही ही मागणी मान्य केली. त्यावरुन आता हा वाद राजकारणाच्या वर्तुळात येऊन ठेपला आहे.

काँग्रेसची मागणी आणि ही मागणी मान्य करणारे सरकार यांच्यावर विरोधी पक्षाने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन हे टिकास्त्र सोडले आहे. फडणवीस यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे 'भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे.' या ट्विटनंतर लगेच पुढच्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे की, 'संतापजनक! कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?