
काही दिवसांपूर्वी नागपुर येथे, कर्जाची रक्कम परत न दिल्याने सावकाराने कर्जदाराच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. आताही अशा कर्जापायी चंद्रपूर (Chandrapur) येथे याहूनही भयानक घटना घडली आहे. कर्ज वसुल करण्यास गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या पत्नीला व मुलाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलगा 30 तर पत्नी 60 टक्के भाजली आहे. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सावकारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र हरिणखेडे हे चंद्रपूर येथील सरकारनगरमध्ये राहतात. त्यांनी सावकार जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील 2 लाख रुपयांची त्यांनी परतफेड केली होती, व उर्वरित रकमेतील 60 हजार मंगळवारी देण्याचे ठरले होते. त्यानुसार जसबीर हरिणखेडे यांच्या घरी गेला. तिथे त्याची व हरिणखेडे यांच्या परिवारातील इतर लोकांशी शाब्दिक चकमक उडाली. यामुळे संतापाच्या भरात जसबीरने आपल्या गाडीतील पेट्रोल काढून पियुष व कल्पना यांच्यावर ओतले, आणि त्यांना पेटवून दिले. (हेही वाचा: गोरखपूर येथे हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळले, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद (Video))
या घटनेमुळे आरडओरडा झाल्याने शेजारी जमा झाले, त्याचवेळी जसबीरने तिथून पळ काढला. त्यानंतर या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. जसबीर भाटीया हा अवैधरीत्या सावकारी करतो. या हल्ल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी हरिणखेडे कुटुंबाची मागणी आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, जसबीर भाटियावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.