Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Cases In Aurangabad: वुहान शहरातून संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात दररोज हजारो नागरिकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 252 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये 151 पुरूष, 101 महिलांचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 5535 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 2669 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 259 कोरोना रुग्णांचा उपाचारदरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे. आज सकाळी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 191 रुग्ण हे शहरातील असून 61 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. (हेही वाचा - महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यात 1 लाख 22 हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती)

दरम्यान, सोमवारी औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात 58 वर्षीय पुरूष आणि 61 वर्षीय महिला कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत 62, घाटीत 196, मिनी घाटीमध्ये एक अशा एकूण 259 कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.