Sameer Wankhede यांच्या अडचणींमध्ये वाढ? Bhim Army आणि Swabhimani Republic Party ने केली जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मागणी
Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

मुंबईत एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आपली जात लपवल्याचा आरोप केला होता. या आरोपांबाबत वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांकडून क्लीन चिट मिळाली असली तरी, आता दलित संघटनांनी त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र बनवून नोकरी मिळवल्याचा आरोप आहे. याशिवाय क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातही त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे.

समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राशी निगडीत वादात भीम आर्मीनेही (Bhim Army) उडी घेतली आहे. समीर यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार भीम आर्मीचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक कांबळे यांनी बुधवारी माटुंगा, मुंबई येथील जिल्हा जात प्रमाणपत्र चौकशी समितीकडे केली आहे. समीर यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा या संघटनेने केला आहे, तसेच समीर यांनी एका दलित मुलाचा हक्क मारला आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

भीम आर्मी लवकरच समीर यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा विचार करत आहे. समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी स्वत: एससी असल्याचे सांगितले होते, असा दावा दलित संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. केवळ भीम आर्मीच नाही तर स्वाभिमानी रिपब्लिकन आर्मीनेही (Swabhimani Republic Party) समीर यांच्यावर आरक्षण मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे दाखवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या वतीने जिल्हा जात छाननी समितीकडे तक्रारही करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे दिल्लीतील एससी/एसटी आयोगाच्या कार्यालयात पोहोचले होते. तेथे त्यांनी त्यांचे जातीचे प्रमाणपत्र, पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाचा जन्म दाखला आणि घटस्फोटाची कागदपत्रे सादर केली. सध्या आयोग त्या कागदपत्रांची तपासणी करत आहे, मात्र त्याआधीच समीर वानखेडे यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. (हेही वाचा: भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी सरकारमधील 'या' मंत्र्याकडे केली राजीनामा देण्याची मागणी, वाचा नेमकं प्रकरण काय ?)

दुसरीकडे, समीर वानखेडे यांच्या वडिलांनी ते दलित असून त्यांचा मुलगाही दलित असल्याचे सांगितले आहे. त्यांचा मुस्लीम धर्माशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले आहेत. परंतु या दाव्यांच्या विरोधात समीरच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीचे लग्न मुस्लिम कुटुंबात झाले होते आणि तिथे सर्व इस्लामी प्रथा पाळल्या गेल्या होत्या.