गेल्या अडीच महिन्यांपासून भारत कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. या साथीच्या आजारामुळे अनेक लोकांना लॉक डाऊन (Lockdown) मुळे घरातच बसावे लागत आहे. अनेक कार्यक्रम रद्द झाले आहे, खेळांच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. यंदा सार्वजनिकरित्या सण-उत्सव साजरे करणे टाळले आहे. अशात आषाढी वारी आणि गणेशोत्सवावर (Ganeshotsav 2020) या विषाणूचे संकट असलेले दिसून येत आहे. या दरम्यान पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांनी यंदा गणपती उत्सव अगदी साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंडळांची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
पुण्यातील गणेशोत्सवाला फार मोठी परंपरा आहे. त्यात मानाचे 5 गणपती म्हणजे पुण्याचे वैभव आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान हजोरोंच्या संख्येने लोक पुण्यातील गणपती पाहायला जमतात. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सव पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. यावर्षी फक्त पारंपरिक पद्धतीने उत्सव मंडप उभारला जाणार आहे, साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पडतील, यावेळी गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल. तसेच नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
(हेही वाचा: लॉकडाउनमुळे मुंबईतील मद्यपींची गैरसोय होत असल्याने वसई-विरार-पालघर ठरतायत सध्या दारु मिळण्याचे हॉटस्पॉट)
प्रशासनाने घालून दिलेल्या अटी, नियम ध्यानात घेऊनच यंदाचा गणेशोत्सव पार पडेल असे मंडळाच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आले. यावेळी कोणत्याही मंडळाने गणपतीला मास्क न लावण्याचे आवाहन केले गेले आहे. या बैठकीलाला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष श्री राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष श्री प्रविणशेठ परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार श्री विवेक खटावकर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री संजीव जावळे, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार श्री संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री सुनिल रासने उपस्थित होते.