रेल्वे रुळांशेजारी कचऱ्याला लागलेल्या आगीदरम्यान खोळबंळलेल्या लोकलमध्ये वृद्ध महिलेला आला हृदयविकाराचा झटका
Representational Image (Photo Credits: PTI)

कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांशेजारी असलेल्या कचऱ्याला आज सायंकाळच्या सुमारास आग लागली होती. या आगीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेची ठाणे-कल्याणदरम्यानची धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. या घटनेमुळे खोळंबलेल्या लोकलमधील एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला. रेवती संपत, असं या या वृद्ध महिलेचं नाव आहे. रेवती यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

कळवा रेल्वे रुळाजवळील कचऱ्याला आग लागली होती. दरम्यान, ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी ही आग विझवली. परंतु, या घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही मिनिटे रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली होती. (हेही वाचा - शिवसेना नेते अरविंद सावंत यांची राज्यातील संसदीय सदस्य समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक)

कळवा स्थानकाजवळ उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून डोंबिवलीकडे जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी रेवती संपत यांना लोकलमधील गर्दीत हृदयविकाराचा झटका आला. लोकलमधील इतर महिलांनी यासंर्भात रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रेवती यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या आगीमुळे कळव्याहून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल खोळबंळ्या होत्या. त्यामुळे कामावरून परतनाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.