Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

विधानसभा निवडणूक 2019 (Assembly elections 2019) प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी झंजावती दौरे केले. भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षाची हवा असतानाही शरद पवार यांनी एकहाती किल्ला लढवत विरोधी पक्षांच्या शिडात आत्मविश्वासाची हवा भरली आणि जनमत आपल्या बाजूने वळवले. त्याचा परिणाम विधनसभा निवडणूक निकालात दिसला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाआघाडीला चांगले यश मिळाली. असे असले तरी शरद पवार यांच्या यशात त्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार करणाऱ्या आणखी दोन तरुणांचाही समावेश आहे. एक खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari).

डॉ. अमोल कोल्हे आणि तडफदार भाषणं

डॉ. अमोल कोल्हे यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक 'बोलका' चेहरा मिळाला आहे. 'राजा शिव छत्रपती' आणि त्यानंतर 'छत्रपती संभाजी महाराज' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेले डॉ. कोल्हे यांनी राजकारणाचा श्रीगणेशा शिवेसना या पक्षातून केला. मात्र, पुढे ते शिवसेनेच्या शिवबंधनातून मुक्त झाले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा दाखल झाले. डॉ. कोल्हे यांनी अल्पावधीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थिरस्थावरता मिळाली. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये ते शिरुर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे तगडे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.

अत्यंत तळमळीने आणि तडफेने बोलणे हे डॉ. कोल्हे यांच्या भाषणाचे खास वैशिष्ट्य. टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साखारल्या प्रमाणे त्यांच्या शब्दफेकीत अभिनय जाणवतो. अत्यंत लयबद्धता आणि कधी छोट्या तुकड्यात तर कधी पल्लेदार वाक्यरचणा श्रोत्यांवर गारुड टाकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची एक बाजू शरद पवार आणि दुसरी बाजू कोल्हे सांभाळत होते. त्यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक प्रचारात केलेले विधान प्रचंड गाजले. इथे भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीनिवास पाटील असा सामना होता. पाटील यांच्या प्रचारार्थ बोलताना कोल्हे यांनी 'मान साताऱ्याच्या गादीला मत मात्र राष्ट्रवादीला' हे विधान प्रचंड गाजले. (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर इथे होणार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची फाईट, राज ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची)

अमोल मिटकरी सोशल मीडियावरील हिरो

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचारात शरद पवार, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोब आणखी एक नाव जोरदार चर्चेत होते. हे नाव म्हणजे अमोल मिटकरी. अमोल मिटकरी यांच्या भाषणालाही तुफान प्रतिसाद मिळत होता. खास करुन अमोल मिटकरी यांची भाषणे युट्युब आणि सोशल मीडियावर जोरदार हीट ठरताना दिसत होती. युट्युबवरील त्यांच्या भाषणाला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत असत. आजही मिळतात. कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव असलेला हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौकटीत घट्ट बसतो.

विधानसभा निवडणूकीत भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 , काँग्रेस 44 आणि इतर पक्षांना 29 जागा मिळाल्या. या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला. भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा सहज जिंकू असे म्हणत होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही तसा दावा केला जात होता. पण, जनतेने भाजपच्या दाव्याला टाचणी लावली. जनतेने युतीला पुन्हा सत्ता दिली. मात्र, विरोधकांनाही प्रबळ बनवले.