Amol Kirtikar | Twitter

लोकसभा निवडणूक निकाला दिवशी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत निकाल उत्कंठावर्धक झाली होती. शेवटच्या क्षणी अवघ्या 48 मतांनी पराभूत झालेल्या अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांनी आता निकालाविरूद्ध कोर्टात धाव घेण्याचा निर्णय बोलून दाखवला आहे.  लोकसभा निवडणूक निकालाविरोधात राज्य निवडणूक आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अमोल कीर्तीकर यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमोल कीर्तिकर यांनी राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतमोजणी केंद्रावरील EVM मध्ये छेडछाड केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यासोबतच मायक्रोप्रोसेसर आणि सॉफ्टवेअर लोडिंग युनिट (SLU) च्या स्टोरेजसाठी निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीचं पालन केलं गेलं नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अमोल कीर्तीकर यांच्या विरूद्ध महायुतीच्या शिवसेनेकडून रविंद्र वायकर यांचं आव्हान होते. रवींद्र वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती आणि या फेर मतमोजणीमध्ये अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर निकालाच्या दिवशी ईव्हीएमची पुन्हा मोजणी करावी, अशा प्रकारची मागणी अमोल कीर्तिकर यांनी केली होती.  मतमोजणी केंद्राचे व्हिडीओ फुटेज मागितले असून अजूनही ते देण्यात आले नाही असे कीर्तिकर म्हणाले आहेत. Lok Sabha Election 2024 Result: यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात Mahavikas Aghadi ला मोठे यश; पहा राज्यातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी (See List) .

अमोल किर्तीकरांच्या लोकसभेमधील निसटत्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे जाहीर केले होते. त्यामुळे आता या निकालाला कोर्टात आव्हान देण्यासाठी कीर्तीकर सज्ज असल्याचं पहायला मिळालं आहे. अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक यंत्रणा सरकारच्या दावणीला बांधली असली तरीही न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल अशी अशा व्यक्त केली आहे. लवकरच ते मुंबई उच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार आहेत.