मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात महत्त्वाच्या बातम्या, अपडेट्स लोकांनापर्यंत पोहचवणाऱ्या राज्यातील पत्रकारांना 'फ्रंटालाई वर्कर्स' (Frontline Workers) घोषित करुन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे. तसंच त्यांना इतर सुविधाही देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहे. दरम्यान, हे पत्र लिहून अमित ठाकरे यांनी महत्त्वाच्या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. (मनसे च्या मिशन मुंबई प्लॅन मध्ये राज ठाकरेंनी अमित ठाकरे वर सोपवली 'ही' जबाबदारी)
अमित ठाकरे यांनी पत्रात लिहिले, "कोरोना महामारी विरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्याप्रमाणे पत्रकारही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोना महामारीच्या प्रतिकुल परिस्थितीला निधड्या छातीने सामोरे जात पत्रकार बांधव वार्तांकनाचं काम अविरतपणे करत आहेत. त्यामुळेच या कठीण काळातही ठिकठिकाणाची वास्तव स्थिती सर्वांपर्यंत पोहचत आहे. मात्र दुर्दैवाने यात अनेक पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी काहींना आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना आपले प्राणही गमवावे लागले."
"भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि वार्तांकनाचे काम निर्धोकपणे करता यावं यासाठी त्यांचा फ्रंटलाईन वर्कर्स च्या यादीत समावेश करावा. संबंधित सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात आणि त्यांचे प्राधान्याने कोविड-19 लसीकरण करण्यात यावे," अशी आग्रहाची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
अमित ठाकरे ट्विट:
तसंच पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हा, तालुका पातळीवरील त्यांच्या संघटनांना विश्वासात घ्यावे, असंही अमित ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे. यापूर्वी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची मागणी केली होती. दरम्यान, राज्यातील पत्रकार आणि पत्रकारांच्या विविध संघटना त्यासंदर्भात मागणी करत आहेत. आतापर्यंत देशांतील 12 राज्यांमध्ये पत्रकारांना फ्रंटालाईन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे.