अमित शाह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राज्य सरकारकडून जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची पुर्नचौकशी करण्याचे संकेत
जस्टीस लोया File Image | (Photo Credits: ANI)

गुजरातमधल्या सोहराबुद्दीन बनावट एन्काऊन्टर प्रकरण बरेच गाजले होते. या प्रकरणात जस्टिस ब्रिजगोपाल लोया (Judge Brijgopal Harkishan Loya) हे CBI कोर्टाचे न्यायाधीश होते. मात्र नागपूर येथे एका लग्नासाठी गेले असताना लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे सांगण्यात येत आहे. मात्र आता राज्य सरकार (Maharashtra Government) जस्टिस लोया यांच्या केसची फाईल पुन्हा ओपन करण्याची शक्यता आहे.

राज्याचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी तसे संकेत दिले आहेत. सोहराबुद्दीन बनावट एन्काऊन्टर प्रकरणात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झाले होते, मात्र नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. अमित शाह यांचे नाव आल्याने ते प्रकरण बरेच गाजले होते.

सोहराबुद्दीन बनावट एन्काऊन्टर प्रकरणात लोया यांना धमक्या मिळत होत्या, त्यानंतर त्यांना रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप विष देण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप अॅड. सतिश उके यांनी केला होता. पुढे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी याचिकेद्वारी केली होती. आता राज्य सरकार या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. आज  गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांना जस्टीस लोया प्रकरणाबाबत विचारणा झाली. (हेही वाचा: केंद्राकडून महाराष्ट्राला वाहतूकीच्या दंड वसूलीबाबत 'अल्टिमेटम' जारी)

त्यावर बोलताना, 'काही लोकांनी मला या प्रकरणाबाबत भेटण्याची विनंती केली आहे, येऊन भेट त्यानंतर मी चौकशी करतो, असे मी त्यांना सांगतले' ही माहिती देशमुख यांनी दिली. जर ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला तर गृहमंत्री अमित शाह यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. मात्र दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने लोया यांचा मृत्यू नैसार्गीत होता असे सांगत, त्या प्रकरनचीए चौकशी करण्यास नकार दिला आहे.