Ameya Khopkar & Raj Thackeray (Photo Credits: Facebbok)

आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद रिक्त झालं आहे. त्यामुळे या जागी राजपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विराजमान होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तसंच मनसे नेते आणि पदाधिकारी देखील तशा प्रकारची मागणी करत आहेत. त्यातच आता मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी देखील ट्विट करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कळकळीची विनंती केली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या कठीण काळात मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे द्यावी, असं खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Raj Thackeray: अमित ठाकरे यांच्याकडे मनसे मोठी जबाबदारी सोपवणार? आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर MNS विद्यार्थी सेनेचे नेतृत्व करण्याची शक्यता)

अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, "विद्यार्थ्यांसमोर सध्याचा काळ मोठा कठीण आहे आणि त्यासाठीच नेतृत्वही तितकंच खंबीर हवं. मा. राजसाहेब ठाकरे यांना मनापासून विनंती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद आता अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात यावं. राज्यातल्या तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने ही कळकळीची विनंती."

Ameya Khopkar Tweet:

अमित ठाकरे सध्या मनसेच्या नेतेपदी आहेत. त्यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती. मात्र आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.