IPL 2022: महाराष्ट्रात रंगणार आयपीएलचे सर्व सामने, मैदानात प्रेक्षकांना प्रवेश मिळण्याची शक्यता, सुनील केदार यांची माहिती
आयपीएल 2022 लिलाव (Photo Credit: Twitter/IPL)

बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या (IPL 2022) 15व्या मोसमाची तयारी जोरात सुरू केली आहे. लवकरच वेळापत्रकही (IPL Match Timetable) जाहीर होईल. बीसीसीआयने 15 व्या हंगामाचा बदललेला फॉर्मेट आधीच सार्वजनिक केला आहे. आगामी आयपीएलमध्ये प्रेक्षकांना मैदानात एंट्री मिळणार की नाही, असा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक सामने खेळवले जातील, त्यामुळे बीसीसीआय राज्य सरकारच्या (Maharashtra Govt) मार्गदर्शक तत्त्वांवर लक्ष ठेवून आहे. तसेच या स्पर्धेच्या आगामी हंगामातील साखळी सामने वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (Brabourne Stadium), डीवाय पाटील स्टेडियम (DY Patil Stadium) आणि गहुंजे पुणे (Pune) येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या चार ठिकाणी होणार आहेत.

सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यता

महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी शनिवारी सांगितले की, 26 मार्चपासून महाराष्ट्रात होणाऱ्या  आयपीएलच्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यता दर्शवली आहे. या स्पर्धेच्या आगामी हंगामातील साखळी सामने वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (ब्रेबॉर्न स्टेडियम), डीवाय पाटील स्टेडियम आणि गहुंजे, पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या चार ठिकाणी होणार आहेत.

क्रीडामंत्री सुनील केदार येथे एका पत्रकार परिषदेत म्हणाले, “मला आशा आहे की कोविड-19 ची प्रकरणे ज्याप्रकारे कमी होत आहेत, त्यामुळे आमच्यात निर्बंधमुक्त वातावरण असेल. आम्ही आशा करतो की जेव्हा आयपीएलचे सामने आयोजित केले जातात, त्यावेळी असे वातावरण असेल की लोकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल. हे खेळाडूंसाठी एक प्रोत्साहन असेल आणि लोक एकत्र येण्याची ही एक चांगली संधी असेल. कोरोना व्हायरसमुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून लोक घरात बसून आहेत. आपण त्याची अपेक्षा करू शकतो. (हे ही वाचा IPL 2022 Groups Confirmed: मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स, CSK आणि RCB एकाच गटात सामील; लीग टप्प्यात पाहायला मिळतील रंजक सामने)

सर्वाधिक सामने होणार मुंबईत 

वानखेडे आणि डीवाय पाटील येथे 20-20 सामने, तर 15-15 सामने ब्रेबॉर्न आणि गहुंजे स्टेडियमवर खेळवले जातील. केदार म्हणाले की, हे आमचे भाग्य आहे की हे सर्व सामने महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे होणार आहेत. राज्याचा क्रीडा मंत्री या नात्याने मी BCCIचा आभारी आहे. बायो-बबल आणि निर्बंधांसह प्रक्षेकसंख्या यासारख्या मुद्द्यांवर आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांनुसार काम करू.

तत्पूर्वी, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला ​​भेट देऊन पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएलच्या तयारीचा आढावा घेतला. आयपीएलच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, "महाराष्ट्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल आणि सुरुवातीला ते 40 टक्के स्टेडियमच्या क्षमतेच्या असेल. जर कोरोना विषाणूची परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि प्रकरणांमध्ये घट झाली, तर त्यानंतरच्या सामन्यांमध्ये 100 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाऊ शकते.