Bombay High Court | (Photo Credits: ANI)

Akshay Shinde Encounter Case: महाराष्ट्रातील बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. न्यायदंडाधिकारी तपासात (Magistrate Enquiry Report) अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पाच पोलिसांना जबाबदार धरण्यात आले आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी (20 जानेवारी) तपास अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. मृत व्यक्तीसोबत झालेल्या बाचाबाचीत पाच पोलिसांनी केलेल्या बळाचा वापर अवास्तव होता आणि हे पाच पोलीस मृत व्यक्तीच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, बंदुकीवर मृत व्यक्तीच्या बोटांचे ठसे नाहीत, मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अक्षय शिंदेने या बंदुकीतून गोळी झाडली होती.

अक्षयने गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, मात्र पोलिसांचा हा वैयक्तिक बचाव अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे. अक्षय शिंदे (24) याला ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूर येथील शाळेच्या शौचालयात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो शाळेत परिचर होता. सप्टेंबरमध्ये तळोजा कारागृहातून चौकशीसाठी नेत असताना चकमकीत शिंदेचा मृत्यू झाला.

Akshay Shinde Encounter Report:

त्यावेळी पोलिसांनी दावा केला होता की, त्याने पोलीस व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या पोलिसाची बंदूक हिसकावून घेतली व गोळीबार केला. त्यांनतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. कायद्यानुसार, एखाद्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास दंडाधिकारी चौकशी सुरू केली जाते. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने सांगितले की, व्हॅनमध्ये उपस्थित असलेले पाच पोलीस आरोपीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायदंडाधिकारी यांनी मांडला आहे. कायद्यानुसार आता पाच पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास केला जाईल, असे खंडपीठाने सांगितले.

न्यायालयाने सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना या प्रकरणाचा तपास कोणती तपास यंत्रणा करेल हे दोन आठवड्यांत खंडपीठाला सांगण्यास सांगितले आहे. दरम्यान, 20 जानेवारी रोजी आरोपी अक्षय शिंदेच्या पालकांनी त्याच्या मृत्यूबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले होते. आता तपासादरम्यान दंडाधिकारी पथकाने पाच पोलिसांना जबाबदार धरले आहे.