अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीमटेकडी येथे ठेवण्यात आलेल्या महाप्रसादातून 100 ग्रामस्थांना विषबाधा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Wikimedia Commons)

आकोला (Akola) येथे भीमटेकडी गावात डॉ.बाबासाहेब आंबडेकर (Dr. B.R. Ambedkar) यांच्या जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु महाप्रसादामधून जवळजवळ 100 ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणी भीमटेकडी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी प्रचंड भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी 1 वाजताच्या सुमारास भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला खरा परंतु त्यांना काही वेळाने अस्वस्थ आणि उलट्या होऊ लागल्यामुळे गावातील लोक घाबरली. त्यानंतर या भाविकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

तर चार पेक्षा अधिक लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. मात्र विषबाधा कशामुळे झाली यामागील कारण अद्याप समजलेले नाही. तसेच पोलिसांकडून सुद्धा या प्रकरणी अधिक तपासणी केली जात आहे.