श्रावण महिना सुरू झाला आणि आता सण उत्सवांची रेलचेल सुरू झाली आहे. आता गणपती, दसरा, दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. पण एकूणच सण-उत्सवामध्ये लेझर बीम (Laser Beam) आणि डीजेचा (DJ) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण यामुळे होत असलेल्या ध्वनीप्रदुषणाचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. लेझर बीम मुळे डोळे खराब होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत त्यामुळे आता त्याच्या वापराविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Mumbai High Court) याचिका करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून ही जनहित याचिका करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने त्याची दखल घेतली आहे.
सण उत्सवामध्ये ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे या याचिकाकर्त्यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शानास आणून द्यावे अथवा त्याबाबत माहितीचा समावेश असलेले निवेदन सादर करावे, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. नक्की वाचा: Heart Attack Due To Dj: सांगलीत डीजेच्या आवाजामुळे दोघांचा मृत्यू? वाचा तज्ज्ञ काय सांगतात.
डीजेच्या जोर जोरात येणार्या आवाजाने अनेकांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाला आहे. तर डीजे मुळे हृद्याच्या ठोक्यावर परिणाम होत आहे. डीजेच्या दणदणाटाने अनेक जुन्या इमारतींमध्ये कंपने निर्माण होत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील सत्येंद्र मुळ्ये यांनी कोर्टात सांगितले आहे.
लेझर बीमचा त्रास कमी करण्यासाठी कोणतीही विशिष्ट नियमावली नाही. त्यासाठी कोणी तक्रार केली, निवेदन दिले तरीही कारवाई केली जात नाही. या प्रकरणामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करून योग्य आदेश द्यावेत असं याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सांगितलं आहे.