राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे नेहमीच आपल्या रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी 'लव जिहाद' (Ajit Pawar on Love Jihad) या मुद्द्यावरुन थेट मत व्यक्तकेले आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि समाजात जाती-धर्माची तेढ निर्माण करण्यासाटी 'लव जिहाद' च्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम सुरु आहे. मात्र, जाती धर्माच्या नावाने जी तेढ निर्माण केली जात आहे त्याविरोधा समाजातून पाहिजे त्या प्रमाणात आवाज उठत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. कासेगाव येथील क्रांती वीरांगना इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यता आले. या वेळी ते बोलत होते.
अजित पवार यांनी बोलताना संगितले की, इंदुमती पाटणकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेच. परंतू, त्यासोबतच त्यांनी जाती अंताचा लढाही उभारला. त्यांनी समाजातील अनेक तरुण-तरुणींची आंतरजातीय लग्ने लावून दिली. तोच आदर्श घेत जयंत पाटील यांच्याही दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केला आहे, असे अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, Jayant Patil On Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर जयंत पाटील यांचे खळबळजनक वक्तव्य, 'ती तर खेळी')
दरम्यान, इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकासाठी विधानपरिषदेच्या दोन आमदारांच्या निधीतून 22 लाख आणि सीएसआर फंडातून 5 लाख निधी देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकासाठी निधी खालील प्रमाणे
- आमदार मानसिंगराव नाईक यांच्या आमदार निधीतून- 11 लाख,
- आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे आमदार निधीतून- 11 लाख
- सीएसआर फंडातून 5 लाख रुपये- 5 लाख रुपये
एकूण-27 लाख रुपये
दरम्यान, अजित पवार यांनी म्हटले की, प्रत्येकाने आपापल्या धर्माचा आदर करावा. कोणत्याही धर्माने इतरांच्या धर्माबद्दल आकस ठेवा असे सांगितले नाही. त्यामुळे जातीधर्मावरुन भांडण्यापेक्षा, महागाई, बेरोजगारी आत्ताचे जे काही यक्ष प्रश्न निर्माण झाले त्याविषयी आवाज उठवायला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.