अजित पवार (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं (Pune Metro) लोकार्पण आणि काही विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती असली तरीही पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार (Ajit Pawar) यांनी हजेरी लावली होती. जाहीर कार्यक्रमात त्यांनी बोलताना विकासकामात राजकारण नको असं म्हणत पुणे महानगरपालिका आणि पुणे मेट्रोचे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. मात्र मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार विरूद्ध भाजपा असा सुरू असलेला कलगीतुरा इथेही दिसला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BS Koshyari) यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राज्यात वातावरण तापलेलं असताना त्यावरून अजित पवारांनी राज्यपालांवर अप्रत्यक्ष टोला देखील लगावला.

'अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. सन्मानीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये केली जात आहेत. ही वक्तव्ये महाराष्ट्राला मान्य होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थान केलं. ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायाचा आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस नाही, हे ही नम्रपणे नमूद करतो,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला. यानंतर उपस्थितांनी घोषणाबाजी देखील केली. हे देखील नक्की वाचा: PM Narendra Modi Pune Visit: 'अपूर्ण मेट्रोचे उद्घाटन करण्यापेक्षा युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांचा विचार करावा'; शरद पवार यांचा पंतप्रधानांवर निशाणा .

अजित पवारांनी या भाषणाच्या वेळी पंतप्रधानांकडे एक मागणी देखील केली आहे. अजूनही पिंपरी-स्वारगेट जसं सुरू आहे, तसं स्वारगेट ते कात्रज आणि हडपसर ते खराडी मार्गाचे आहे. या दोन मार्गिकेच्या अहवाल प्रकल्पाचं काम सुरू आहे. ते काम पूर्ण करून जसं आताच्या मेट्रोमध्ये 50 टक्के राज्य आणि 50 टक्के केंद आणि 10 टक्के भागिदारी महापालिकेची आहे. त्याच धर्तीवर मेट्रो सुरू करण्यासाठी मदत आपण केली. तशीच मदत आम्हालाही करावी, असे आवाहन केले.

दरम्यान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये दाखल होताच त्यांना खास शिवमुद्रा असलेली पुणेरी पगडी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेनऊ फूट उंचीच्या पुतळयाचं अनावरण केले. यावेळी राज्यपाल देखील उपस्थित होते.