मी राष्ट्रवादी पक्षातच, शरद पवार हेच आपले नेते; अजित पवार यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात तर्कवितर्क
Ajit Pawar (Photo Credits-ANI)

उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गायब असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) हे आज सोशल मीडिया खास करुन ट्विटरवर सक्रिय झाले आहेत. एकापाटोपाठ एक असे ट्विट करण्याचा अजित पवार यांनी धडाकाच लावला आहे. त्यांनी आज केलेल्या अनेक ट्विटपैकी शरद पवार (Sharad Pawar) यांचा नामोल्लेख असलेले एक ट्विट प्रचंड सूचक मानले जात असून, त्याची राज्याच्या राजकारणातही उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. 'मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील' असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे.

अजित पवार यांच्या ट्विटमुळे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांच्या भूमिकेवर आता राष्ट्रवादी आणि दस्तुरखुद्द शरद पवार यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात परतावे तसेच, उपमुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी अजित पवार यांची मनधरणी सुरु आहे. भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून अजित पवार यांच्यावर मोठा दबाव असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार या दबावातून कसा मार्ग काढतात याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, अजित पवार यांच्यावर नेमकी काय कारवाई झाली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण पत्र; वाचा सविस्तर)

अजित पवार ट्विट

दरम्यान, राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार आणि निर्माण झालेला घटनात्मक पेच आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उप-मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राजभवन येथे शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकवेर आज सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही. या याचिकेवर आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.