Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही नागपूर येथेच आहे. त्यामुळे या अधिवेशनासाठी येणाऱ्या भाजप आमदारांना रेशीमबाग (Reshim Bagh Nagpur) येथे बोलावले जाते. या कार्यक्रमात डॉक्टर हेडगेवार (Keshav Baliram Hedgewar) व गोळवलकर गुरुजी (Madhav Sadashivrao Golwalkar) यांना अभिवादन आणि आमदारांना मार्गदर्शन केले जाते. दरम्यान, या कार्यक्रमासाठी भाजपसोबतच यंदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar गट) आमदारांनाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमासाठी अजित पवार समर्थक आमदार जाणार नसल्याचे वृत्त आहे. एबीपी माझाने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

 आशिष शेलार यांच्याकडून निमंत्रण

भारतीय जनता पक्षाचे विधीमंडळातील मुख्य प्रतोद आशिष शेलार यांच्याकडून तिन्ही पक्षांच्या (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) आमदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या निमंत्रणातून अजित पवार गट काहीसे अंतर राखून असल्याचेच पाहायला मिळते आहे. दरम्यान, भाजपचे सर्व आमदार आमदार डॉक्टर हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे समजते. मात्र, या कार्यक्रमास शिंदे गटातील आमदार जाणार का? याबाबत मात्र अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे त्याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Sheher-E-Khatib: शेहेर- ई-खतीबचा दाऊदशी संबंध नाही; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्री गिरीश महाजन यांना क्लनि चिट)

 युतीधर्म म्हणून भाजप विचारसरणीचा पुरस्कार?

अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटातील आमदार भाजपच्या कच्छपी लागले असून लवकरच ते भाजप प्रवेश करतील. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये प्रामुख्याने याबाबत स्पष्ट चित्र दिसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात या आधीपासूनच सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एकूणच धोरणे आणि सरकारमध्ये आल्यावर घेतलेली भूमिका पाहिली तर चित्र बरेच काही सांगून जाते. दोन्ही नेत्यांनी भाजपच्या अजेंड्यानुसार अनेकदा भूमिका घेतली आहे. ही भूमिका स्पष्ट आणि उघडपणे घेतली नसली तरी मूक संदेश जाईल असे या दोन्ही नेत्यांचे वर्तन राहिले आहे. त्यामुळे आगामी काळात युतीधर्म म्हणून भाजप विचारसरणीचा पुरस्कार उघडपणे करणार का? याबाबतही उत्सुकता आहे.

दरम्यान, अजित पवार आणि त्यांच्या गटाने तुर्तास तरी रेशीम बाग येथे जाण्याचे टाळले असले तरी, ते जाणारच नाहीत, असेही अद्याप स्पष्ट झाले नाही. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात मात्र नियोजित कार्यक्रमाचे कारण देत अजित पवार यांनी सध्यातरी या कार्यक्रमापासून स्वत:ला दूर ठेवल्याचे समजते. अर्थात, रेशीम बागेत हजेरी लावली तर त्याचा जनमानसात जाणारा अर्थही पवार गटाला ठावूक असल्याने सावध पावले टाकली जात असल्याची चर्चा आहे.