अजित पवार यांनी सांगितली महाविकास आघाडी च्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार हे जरी सांगण्यात आलं असलं तरी त्याची तारीख मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात अली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख नक्की कोणती असणार याचा खुलासा केला आहे. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तसेच या मुलाखतीदरम्यान ते असंही म्हणाले की पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात मात्र अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आणि येत्या 30 तारखेला शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचंही बोललं जात आहे.

इतकंच नव्हे तर त्यांनी या मुलाखतीत बोलताना भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देखील खडे बोल सुनावले. "हातची सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं दुःख मी समजू शकतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने गाया मरत नाही," अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला यांना लगावला.

तसेच जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुका लवकरच येणार आहेत. त्यात देखील महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; शपथविधीसाठी विधान भवन परिसरात तयारी सुरू

अजित पवार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात मतभेद आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "सध्या मी साधा आमदार असल्याने प्रोटोकॉलनुसार स्वतःहून जागा बदलून घेतली. थेट मुख्यमंत्र्यांशेजारी बसणं प्रोटोकॉलला धरून नव्हतं. हर्षवर्धन पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत."