
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पुण्यात एका 24 वर्षीय तरूणाने एमपीएससीच्या दिरंगाईला कंटाळून स्वतःचा जीव घेतल्याची सुन्न करणारी बातमी पाहून सरकार खडबडून जागं झालं आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात काल अजित पवारांनी (Ajit Pawar) 31 जुलै पर्यंत एमपीएससीच्या सदस्यांची आणि आज 15,515 जागांसाठी भरतीला वित्त विभागाने मंजुरी दिल्याचं जाहीर केले आहे. दरम्यान 2018 पासून विविध श्रेणींमध्ये रिक्त असलेल्या जागांवर आता एमपीएससी (MPSC) कडून लवकरच भरती होणार आहे.
महाराष्ट्रात एमपीएससी कडून गट अ, ब आणि क अशा तीन विविध श्रेणींमध्ये एकूण 15,515 जागा आहेत. अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडून आता या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दिल्याने लवकरच रिक्त जागांवर नोकर भरतीची प्रक्रिया वेगवान होणार आहे. एमपीएससी निकालांचे प्रश्न देखील तातडीने सोडवण्यासाठी उपाय योजनांमध्ये ठोस निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
एमपीएससी मध्ये कोणत्या श्रेणीमध्ये किती जागा?
अ श्रेणी मध्ये 4417 जागा
ब श्रेणी मध्ये 8031 जागा
क श्रेणी मध्ये 3063 जागा
महाराष्ट्रामध्ये मागील वर्ष दीड वर्षामध्ये कोरोना संकट आणि मराठा आरक्षण रखडल्याने नोकरभरातीचा देखील वेग मंदावला आहे. अनेक विभागात परीक्षा झाल्या आहेत पण अद्यापही मुलाखती झालेल्या नाहीत. तर काहींची निवड झालेली आहे पण अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने तरूण मंडळी घरात बसून आहेत. अनेकांच्या नोकर्या कोरोना संकटात गेल्याने बेरोजगारी देखील वाढली आहे.