Ajit Pawar News: अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी अजित पवार यांची दांडी, अर्थखात्यावरुन केलेल्या विधानाचीही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे काल (शनिवार, 23 सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी लालबागचा राजा आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निवास्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्याच्या बातम्या झाल्या. पण एका घटनेने मात्र सर्वांच्या भूवया उंचावल्या. ती म्हणजे या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोठेच दिसले नाहीत. खरे तर त्यांची या दौऱ्यातील उपस्थिती, महत्त्वाची आणि अपेक्षीत मानली जात होती. मात्र, असे नेमके काय घडले त्यांनी या दौऱ्यालाच दांडी मारली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री आणि उपमुख्यमंत्री (पवार) यांच्या संयुक्त उपस्थितीत मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रीकेवरही त्यांचे नाव असतानाही त्यांनी या दौऱ्यापासून अंतर ठेवले. सहाजिकच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

अजित पवार यांचे अमति शाह यांच्या दौऱ्यात अनुपस्थित असणे हे जसे चर्चेचा विषय ठरले आहे. तसेच, त्यांनी बारामती येथे केलेल्या एका विधानाचीही जोरदार चर्चा आहे. ज्यामुळे त्यांनी भविष्यातील राजकारणाचे काही वेगळे संकेत तर दिले नाहीत ना? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. अजित पवार हे शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. या वेळी एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, आपल्याकडे अर्थमंत्री पद आहे. त्यामुळे बारामतीला कधी निधीची कमतरता भासली नाही. नेहमची झुकते माप मिळाले. बारमीत हा शब्द दिसला तरी आपण सही करायचो. मात्र, हे नेहमीच चालणार नाही. अर्थमंत्री पद आज आहे. उद्याचे काय माहिती. उद्याबद्दल कोणालाच काही सांगता येत नाही.

अजित पवार यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यातच अमित शाह हे महाराष्ट्रात आले असताना त्यांचे फटकून राहणे हे अर्थ काढण्यास अधिक बळकटी देत आहे. बारामतीमध्ये एका कार्यक्रमात सहकार संस्था आणि कारखान्यांसंदर्भात ते बोलत होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना आपल्याकडे अनेक योजनांच्या फाईल्स यायच्या. आम्ही गावाची नावे पाहायचो. त्यात बारामती नसले तर ते नाव टाकायचे आणि मग मंजूरी द्यायची, अशी कामे व्हाययची. त्यातूनच 42 कोटी रुपयांचे मॅग्नेटचे काम बारामतीला मिळाले, असेही ते म्हणाले.