Air India Building: एअर इंडियाची इमारत महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात; केंद्राने दिली मान्यता, 1,601 कोटी रुपयांना झाला करार
Photo Credit - Wikipidia

गुरुवारी, 14 मार्च रोजी केंद्र सरकारने एअर इंडियाची (Air India Building) प्रसिद्ध इमारत महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर ही इमारत महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येईल. मुंबईतील नरिमन पॉइंट येथे एअर इंडियाची एक भव्य इमारत आहे, जी काही काळापूर्वी महाराष्ट्र सरकारने 1601 कोटी रुपयांना खरेदी केली होती. सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील एअर इंडियाची प्रसिद्ध इमारत महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. सचिव पांडे यांनी लिहिले की, भारत सरकारने एआय ॲसेट होल्डिंग कंपनी लिमिटेडच्या एअर इंडिया इमारतीची मालकी महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे.

इमारत 1974 मध्ये बांधली गेली

केंद्र सरकारने 27 जानेवारी 2022 रोजी एअर इंडिया टाटा समूहाकडे हस्तांतरित केली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारने एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. आता राज्य सरकारला या इमारतीचा मालकी हक्क मिळाल्यानंतर त्याचा वापर सरकारी कार्यालय म्हणून केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत 1974 मध्ये बांधण्यात आली होती. ही इमारत 23 मजली असून ती 46,470 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे.

(हेही वाचा: दिल्लीच्या JNU मध्ये सुरु होणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र; केला जाणार महाराजांच्या चरित्राचा आणि राज्यकारभाराचा अभ्यास)

मुंबईची ही इमारत समुद्रकिनारी बांधलेली आहे. ही इमारत न्यूयॉर्कमधील आर्किटेक्ट फर्म जॉन्सन बर्गे यांनी बांधली आहे. याशिवाय बर्गीने इतरही अनेक इमारती बांधल्या आहेत. याआधी 2012 मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर, दक्षिण मुंबईतील राज्य सचिवालयाच्या इमारतीमधील जीटी हॉस्पिटलमधून सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता आणि ग्रामीण विकास हे चार प्रमुख विभाग कार्यरत आहेत. हे विभाग इतर विभागांसह एअर इंडिया भवनमध्ये हलवले जाऊ शकतात.