अहमदनगर महानगरपालिका निवडणूक निकाल 2018:  आज मतमोजणी, जनतेचा कौल दुपारपर्यंत स्पष्ट होणार
vote counting | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Ahmednagar Municipal Corporation Election 2018 Poll Results: अहमदनगर महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) निवडणुकासाठी मतदान रविवारी पार पडल्यावर सर्वांना उत्सुकता आहे ती आज होणाऱ्या मतमोजणीची. आज सकाळी दहा वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महापालिकेवर कोणता पक्ष किंवाआघाडी झेंडा फडकवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रविवारी सायंकाळी मतदान पूर्ण झाले तेव्हा सुमारे 70 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगितले जात आहे. सायंकाळी उशीरपर्यंत हे मतदान सुरु असल्यामुळे एकूण किती टक्के मतदाना झाले याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, मतमोजणी सुरु झाल्यानंतर दुपारपर्यंतच पालिका निवडणुकीत कोणी बाजी मारली हे चित्र स्पष्ट होणार आहे. मैदानात असलेल्या भाजपा ((BJP), शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रीय काँग्रेस (National Congress)  या प्रमुख पक्षांनी विजयावर दावेदारी सांगितल्यामुळे कोणाचा दावा खरा ठरणार याबात उत्सुकता आहे.

महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण प्रभागातील, अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १८ जागा राखीव आहेत. राजकीय विश्लेषणासाठी विद्यमान स्थितीवर नजर टाकायची तर, राष्ट्रावादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडी करून मैदानात आहेत. तर, राज्यात आणि केंद्रात सत्तेत एकत्र असलेले शिवसेना, भाजप स्वतंत्र लढत आहेत. महापालिका निवडणूकीसाठी एकूण असलेल्या 68 जागांसाठी भाजप सर्वच्या सर्व 68 जागा लढवत आहे. तर, शिवसेना 61, राष्ट्रवादी 46, काँग्रेस 21 जागा लढवत आहे. भाजपच्या एकूण 68 उमेदवारांपैकी 35 महिला उमेदवार आहेत. याशिवाय १०६ अपक्षांचे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे.(हेही वाचा, धुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला)

अहमदनगर महापालिकेच्या निवडणूक इतिहासावर नजर टाकता महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणूकीत शिवसेनेचा महापौर निवडूण आला होता. मात्र, त्यानंतर पुढे कोणत्याच राजकीय पक्षाला अहमदनगरवर सलग 5 वर्षे सत्ता राखता आली नाही. त्यामुळे आजच्या मतमोजणी निकालातून काय समोर येते याबाबत उत्सुकता आहे.