Ahmednagar: मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून भाजप तालुकाध्यक्षांचा जावयावर प्राणघातक हल्ला
Representational Image | (Photo Credits: IANS)

मुलीने आतंरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून भाजपच्या तालुकाध्यक्षांनी जावयावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात (Nevasa Police Station) मुलीच्या वडिलांसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळ असलेले हत्यारे देखील जप्त करण्यात आली आहेत.

भाजपचे तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांच्या मुलगी ऋतुजा हिने प्रशांत उर्फ बंटी राजेंद्र वाघ याच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. मात्र, मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून माणिक यांनी नेवासे येथे नऊ जणांना बरोबर घेऊन प्रशांतला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशांतला मारहाण करण्यासाठी सुपारी देऊन खेडकर यांनी काही गुन्हेगार सोबत आणल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी माणिक खेडेकर, हृषीकेश खेडकर, प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भीमराज कानोजे, शाहिद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी दिली आहे. तर, माणिक खेडकर, त्यांचा चुलत भाऊ व हृषीकेश खेडकर हे तिघेजण फरार आहेत, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा-Maratha Reservation Hearing: सर्वोच्च न्यायालयाचं 18 मार्च पर्यंतचं नियमित वेळापत्रक रद्द करत पुढील सुनावणी 15 मार्चला; इतर राज्यांना देखील आरक्षण प्रकरणी जाणार नोटीस

या घटनेनंतर अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. तसेच प्रशांतच्या जीवाला धोका असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय करे करीत आहेत.