Ahmednagar Accident: ऊसाच्या ट्रलीला धडक बसून कारचा अपघात, तीघे जण जागीच ठार, अहमदनगर जिल्ह्यातील घटना
Road Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील काष्टी येथे घडली. रविवारी (13 फेब्रुवारी) रात्री एक ते दीड वाजणेच्या सुमारास घडली. अपघात इतका भयानक होता की, धडकेत कारच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघाताच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर उभा राहिला आहे.

राहुल आळेकर, केशव सायकर, आकाश खेतमाळीस अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार हे तिघेही एकमेकांचे मित्र होते. ते केशव सायकर याला सोडण्यासाठी निघाले होते. या वेळी त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात हे तिघेही मित्र जागीच ठार झाले. ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला कारने पाठीमागून धडक देण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. अनेकांकडून शक्यता वर्तवली जात आहे की, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. (हेही वाचा, Katol Road Accident: भीषण अपघातात चार महिला मजुर ठार, पाच गंभीर जखमी; नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील घटना)

स्थानिकांनी सांगितले की, अपघात घडलेला श्रीगोंदा ते दौंड या रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. हा रस्ता सिमेंटचा आणि मोठा असल्याने वाहने अत्यंत भरधाव वेगाने येतात. त्यातच तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगामही सध्या सुरु आहे. त्यामुळे ऊसांची वाहतूक करणारी वाहने ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली मोठ्या प्रमाणावर येतात. अनेकदा ऊस वाहतू करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठिमागच्या बाजूला रिफ्लेक्टर नसतात. त्यामुळे अपघात घडतात.