कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात अनेकजण गरजूना मदत करत आहेत. मात्र, ही मदत करताना अनेकजण एकत्र येऊन फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. मात्र, अशा लोकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना दोन पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास व मदत वाटप करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास फोटातील सर्व व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी (Ahmadnagar District Collector Rahul Dwivedi) यांनी आदेश दिले आहेत.
देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शहरातील अनेक कामगारांनी पायी स्थलांतर करण्यास सुरुवात केली. मात्र, लॉकडाऊनमुळे रस्त्यांत या लोकांचे हाल झाले. या स्थलांतरितासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि दानशूर लोक धावून आले. परंतु, यातील काहीजण मदत करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रसिद्धी मिळवत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. मात्र, आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी (Ahmadnagar District Collector Rahul Dwivedi) यांनी या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा - Coronavirus: वरळी आणि धारावीत लॉकडाऊनचं उल्लघंन करणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर; मुंबई पोलिस ड्रोनला स्पीकर लावून देणार सुचना)
राहुल द्विवेदी यांनी जाहीर केलेल्या आदेशात कोणत्याही प्रकारची मदत वाटप करण्यापूर्वी नजीकच्या तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन यांच्याकडून व्यक्तीगत आणि वाहनांचे पासेस प्राप्त करून घ्यावेत, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच मदत वाटप करणाऱ्यांची संख्या दोन पेक्षा अधिक असू नये, असंही या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या 27 वर पोहचली आहे. याशिवाय अहमदनगर जिल्ह्यात सारीचे संकटही उद्भवलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.