मुंबई 24x7 सुरू ठेवण्याला प्रस्तावित वेळेआधीच होणार सुरूवात; प्रजासत्ताक दिन निमित्त विकेंडला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉल, मल्टिप्लेक्स मध्ये खास ऑफर्स!
File image of Mumbai's CSMT area | (Photo Credits: PTI)

मुंबई शहर नागरिकांसाठी 24x7 सुरू ठेवण्याच्या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता शहरातील मॉल मालकांनी याला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी सुरूवात केली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या विक एंडला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आज (24 जानेवारी) पासून काही मॉल मालकांनी दुकानं खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासुन म्हणजे फ्राईडे नाईटपासून सलग तीन दिवस ग्राहकांना खरेदी करण्यासाठी विविध ऑफर्सची देखील घोषणा करण्यात आली आहे. मुंबई 24x7 ला राज्य मंत्रिमंडळाची मंंजुरी; 27 जानेवारीपासून शहरात 'नाईट लाईफ' सुरू.

प्रायोगिक तत्त्वावर मुंबईमधील नाईट लाईफ प्रोजेक्टचा आजपासून आढावा घेतला जाणार आहे. यासाठी काही मॉलमधील काही उपहारगृह, मल्टिप्लेक्स आणि खरेदीसाठी दुकानं खुली ठेवली जाणार आहेत. मुंबई शहरामध्ये वरळी परिसरात अ‍ॅट्रिया मॉल, कमला मिल कम्पाऊंडमधील फिनिक्स मॉल सुरू ठेवला जाणार आहे. यामध्ये किती दुकानदारांचा सहभाग असेल याची माहिती यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र आजपासून सुरू होणार्‍या प्रायोगिक तत्त्वावरील या मुंबई 24 x7 प्रकल्पाची पुढचं भवितव्य ठरणार आहे. दरम्यान मुंबई 24 तास खुली ठेवण्याला सरकारचा पाठिंबा असला तरीही दुकानं खुली ठेवायची की नाही? त्याचा अंतिम निर्णय पूर्णतः मालकांचा आहे.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई 24x7 हा प्रकल्प आशादायी असून यामधून मुंबईच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते अशी आशा व्यक्त केली आहे. दरम्यान यामुळे पोलिस यंत्रणेवर ताण येणार नाही याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. येत्या काही दिवसांत मुंबई शहरातील वरळी, गिरगाव चौपाटी, बीकेसी, नरिमन पॉईंट या भागामध्ये फूड ट्रक्स सुरू केले जाणार आहेत.